कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून घरात थांबणे हा एकमेव उपाय असल्याने सरकारने देशभर टाळेबंदीचा आदेश जारी केला. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी होऊन पुणे, मुंबईची हवा शुद्ध व स्वच्छ झाली आहे. टाळेबंदीमुळे लाेकांना शहराबाहेर निघून घ्यावी लागणारी शुद्ध हवा पुणे-मुंबईत घरात बसून मिळत आहे. बांधकाम बंद झाल्याने हवेतील धूळ तर कमी झाली. रस्त्यावरून नगण्य वाहने फिरत असल्याने उष्णतेचे उत्सर्जन कमी होऊन ओझोन पातळी देखील सुधारत आहे.
ओझोनच्या प्रमाणावर पृथ्वीवरील तापमानाचे प्रमाण वाढते. तसेच, ओझोनचा थर कमी पातळ झाल्याने सूर्यापासून निघणारी घातक अतिनील किरण थेट भूपृष्टावर येतात. त्यामुळे मानवी जीवनाची धोक्याकडे वाटचाल सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी बाजू इष्टापत्ती म्हणून पर्यावरण संतुलनाबरोबर ओझोनची पातळी अनुकूल बनत चालली आहे. कमी इंधन जळाल्याने वायू प्रदूषण घटून ओझोनला अपायकारक नायट्रोजन आक्साइड, सल्फर डायआॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड रासायनिक संयुगे तयार होण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याने हवेची गुणवत्ता आणि हवामानाचा अभ्यास करणाऱ्या सफर या सरकारी संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
असा असतो ओझोनचा थर
पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्रीन बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सूर्याची मध्यम फ्रिक्वेन्सीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.
मुंबईतही स्थिती चांगली पुणे शहरात प्रदूषणाच्या प्रमाणात ५५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे शहराच्या मुख्य अंतर्गत भागात सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी झाले आहे. तर, चकचकीत रस्ते असलेल्या कोथरूड भागात वाहनाने धूळ उडण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने अतिसूक्ष्म कण देखील कमी झाले आहेत. पुण्यातील पाषाण, कोथरूड, लोहगाव, कात्रज, आळंदी भागात ओझोनची पातळी देखील सुधारली आहे. मुंबईच्या बीकेसीत ओझोनची स्थिती अतिशय चांगली आहे. वरळी, मालाड, अंधेरी, भागात देखील ओझोन पातळी स्थिर होत आहे. मात्र, नवी मुंबई, भांडूप, चेंबूर, बोरिवली येथे ओझोन पातळी मध्यम असली तरी सुधारत आहे.